विश्वास [ मुक्तछंद]
-------------------------
विश्वास या शब्दाचं वैशिष्टय म्हणजे
या शब्दात श्वास आहे.......
अन् श्वासावर कुणाचा विश्वास नसतो पण श्वासाने केलेला विश्वासघात लिहिण्यासाठी
परत श्वास पाहिजे.........
जावू दे,साराच गोंधळ
ताजमहालला कोण विचारलं असतं
रामसेतू प्रेमाचं प्रतिक झालं असतं
जर ठेवला असता विश्वास सीतेवर तर
रामयुगात खरच रामयुग आलं असतं.
- जगदिश पाटील.
marathi kavita
रविवार, २० सप्टेंबर, २०१५
रामसेतु
रविवार, १९ जुलै, २०१५
तुझा बाप
तुला कसं सांगु सखे
माझा तुझ्या बापावर किती राग आहे
केंव्हा कुठे कसा निघेल
तो बेभरवशाचा नाग आहे
तु आणि मी सोडुन
गावातली सारी माणसं पुतळे बनावे
तुझ्या बापाच्या पुतळ्यासमोर
मी तुझे चुंबन घ्यावे
सोमवार, १३ जुलै, २०१५
चंद्र
पुरे झालं तुला आता
सारखं सारखं चंद्राची उपमा देणं
चंद्र तुझ्या कपाळी शोभतो
बाकी त्याचं काय देणं घेणं
गुरुवार, ९ जुलै, २०१५
माळ
बाप मेल्यानंतर पोराची
करतात तशी चकणी घेवून
माझा माळ एकटक पहातोय
आकाशाकडे आशेने
चार निष्पर्ण बाभळी उभ्या आहेत
त्याच्या ह्रदयातल्या ओलाव्याने
दावनीला खंगलेले दोन हात
दोन कोरड्या विहीरी
त्याचे डोळेच जणू आटलेले
जळजळते निखारे अन् झळया
सारे अंगच जणू पेटलेले
सोमवार, ६ जुलै, २०१५
गावरान प्यार
आपलं गावरान प्यार
गल्ली बोळातच घडायचं
टि.व्ही.वर लैला मजनु पाहुन
आतल्याआत रडायचं
रविवार, ५ जुलै, २०१५
पाऊस आला
पाऊस आला,पाऊस आला
चिंब चिंब ,ओला ओला
आभाळ गच्च , गच्च दिशा
वीजा लागल्या नाचायला
डबक्यांनी केलं काळीज मोठं
पाणी त्यात साचायला
हसतय कोण,हसतय कोण
हिरवा हिरवा चिंचेचा पाला
पाऊस आला,पाऊस आला चिंब चिंब ,ओला ओला
मृगाची वर्दी,श्वासांची गर्दी
धुंद मातीचा हा दरवळला गंध
कोण शेतकरी हा गातोय गीत
नाचून नाचून गुरांचा तुटला बंध
उंच उंच आंब्याच्या फांदीवर
मनसोक्त आज मोर भिजला
पाऊस आला,पाऊस आला
चिंब चिंब ,ओला ओला
पाणी पाणी वहातं पाणी
चिवचिव चिमण्या गाती गाणी
थेंबाचे हे पञ्यावर संगीत
नाचती अंगणी ही मुले अनवाणी
जोरात वारा ,हलत्या तारा
वनात कुणी,मनात कुणी धुंद झाला पाऊस आला,पाऊस आला चिंब चिंब ,ओला ओला
मळ्यात पाणी ,तळ्यात पाणी
गुरा-ढोरांच्या डोळ्यात पाणी
देवाचे आभार मानून हसता हसता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
अंकुर अंकुर उद्याच्या पिकांचा
आज याच्या मनात रूजला पाऊस आला,पाऊस आला चिंब चिंब ,ओला ओला
-जगदिश